Monday, 11 May 2026

तिची फोडणी

 तिची फोडणी 


एखाद्या व्यक्तीची ओळख तिने दिलेल्या फोडणीनें होऊ शकते का?

माझं उत्तर हो असं आहे. माझी आई म्हणजे काही स्वयंपाकघराला बांधलेली जुन्या वळणाची बाई अजिबातच नाही. ती शेवटपर्यंत रेल्वेत सर्व्हिस केलेली आणि जीन्स वगरे घालणारी बाई आहे. पण माझी माझ्या आईची पहिली ओळख हि अन्नदात्री म्हणून असणार हे साहजिक आहे. आई संस्कार करते, लाड करते हे बरोबर पण तिने जेवायलाच वाढलं नाही तर ह्या गोष्टींना आपल्या लेखी खूप कमी महत्व उरत. 

तर माझ्या आईची फोडणी हि माझ्या लेखी तिची महत्वाची ओळख आहे. माझ्या परिवारातील समस्त बायकांची सविनय माफी मागून सांगतो कि माझ्या आईची फोडणी सर्वोत्तम बसते. तिने तेलात मोहरी टाकता क्षणी खमखमीत दरवळ घरभर पसरतो आणि तिथेच आमटी किंवा भाजी मस्त होणार ह्याची ग्वाही मिळते. आमच्याकडे तसा भाज्या उसळींना,  वाटणघाटणाचा आणि कांदालसणाचा मारा नसतो किंवा बेताचा असतो. जेवण उत्तम व्हायला सगळा भर माफक रोजचे जिन्नस आणि पदार्थ योग्य रीतीने शिजण्यावर असतो. इथे जेवण बनवणारीचा कस लागतो. उदाहरण द्यायचं तर - फोडणीत मोहरी कच्ची राहता नये मग ती तोंडात येते, ती तडतडली गेलीच पाहिजे. पण फोडणी जळूनही उपयोग नाही. 

बेसनाच्या लाडवांची गोष्ट अशीच. आईचे बेसनाचे लाडू हमखास खमंग होतात. मी बऱ्याच ठिकाणचे बेसन लाडू खाल्लेत, अनेक वेळेस बेसन नीट न भाजताच लाडू वळलेले असतात आणि ते चिकट लागतात. पण आई बेसन खरपूस गुलबट भाजून जे लाडू करते ते नाव काढण्यासारखेच. आईच्या हातचे बेसनाचे लाडू खमंग असतात, ते तोंडात विरघळतात आणि कधीही दातांना चिकटत नाहीत. ह्यात काहीही सिक्रेट नाहीये. इथे फक्त पदार्थावर अग्नीचा योग्य प्रयोग करण्याची कला कामी येते.

त्यावरून आठवलं, मधल्या काळात काही अपरिहार्य कारणामुळे स्वयंपाकाला बाई ठेवावी लागली ती अजून पर्यंत. पण त्यामुळे एक झालं - आईच्या जेवणाची किंमत लवकर कळली. आईने पोळ्या केल्या कि त्या अगदी दोन तीन दिवसांनंतरही खाण्यायोग्य राहतात ह्याच आकलन स्वयंपाकाच्या बाईने केलेल्या पोळ्यांची दुसऱ्याच दिवशी झालेली दुरावस्था पाहून होत गेलं. दिसायला पोळ्या भाजणं सोपं वाटत असलं तरी तो एक तापमान नियंत्रणाचा नाजूक खेळ आहे. लाटलेली पोळी तापल्या तव्यावर खरपूस भाजायची आहे, करपू द्यायची नाहीये. खरपूस होण्यात आणि करपण्यात अवघ्या काही डिग्री तापमानाचाच फरक असतो. पण अशी व्यवस्थित भाजलेली पोळी योग्य शिजते आणि घास घेतल्यावर दातात जाऊन अडकत नाही. अश्या नीट पोळ्या असल्या कि मग आमरस पोळी खाण्याची मजा इतकी जास्त येते कि पुऱ्यांची गरजच भासत नाही.

सागर म्हणजे माझा भाऊ - त्याला बटाट्याच्या काचऱ्या विशेष आवडतात. मला पण आवडतात, पण सागर विशेष तुटून पडतो - म्हणजे तो अशी नुसती काचऱ्यांची कढई घेऊन संपवू शकतो वगैरे वगैरे. तर त्या काचऱ्या पुन्हा का एवढ्या भारी असतात? कारण त्यात तेलाचं योग्य प्रमाण असतं. बटाटा तळायचा नाहीये पण तेलात कंजूसी पण चालत नाही. फोडणी अगदी साधी असते - मोहरी, हळद आणि लाल तिखट,असलाच तर कढीपत्ता, आणि मीठ... बास एव्हढ्यावरच एक खात राहावा असा पदार्थ होतो. मोहरी योग्य तडतडायला हवी, तिखटाची पूड फोडणीत नीट शिजायला हवी पण जळता कामा नये आणि बटाटयांच्या प्रमाणात तेल नीट हवं. इतक्या माफक अटी आहेत. मग ह्या काचऱ्या नीट शिजायला हव्यात आणि कढईकडे त्या खरपूस लाल व्हायला हव्यात. पण फक्त एकसारख्या खरपूस लाल, करपायला नकोत. 

असो आईचे खूप पैलू आहेत, खूप सांगण्या सारखं आहे. पण तिच्या स्वयंपाकाची तऱ्हा आणि सवयीची झालेली चव ह्या गोष्टी म्हणजे आम्हा भावांना अगदी जन्मापासून झालेली आईची ओळख आहे आणि ती अर्थात अविस्मरणीय आहे. म्हणून ह्यावर लिहिलं गेलं. 

सगळ्या आयांना आणि त्यांच्या लेकरांना आई दिनाच्या शुभेच्छा.


ओंकार गोगटे

११ मे २०२६

No comments: